महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - भीमजयंती निमित्त आदर्श सूत्रसंचालन नमूना

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त म्हणजेच भीमजयंती निमित्त आपल्या शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी सूत्रसंचालनाचा एक आदर्श नमुना.. 

dr babasaheb ambedkar jayanti bhimjayanti


🔰कार्यक्रमाची सुरुवात

सुस्वागतम ..सुस्वागतम .. सुस्वागतम ..

आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजेच भीमजयंती.. आजच्या या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सर्वप्रथम शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो/करते.

होते अंधारलेले जीवन दाविला प्रकाश

सर्वसामान्यांना झेप घेण्या खुले केले आकाश

वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना

सुरुवात करतो मी/करते मी आजच्या कार्यक्रमाला..

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.. अशी भीमगर्जना करून शिक्षणाचे महती सांगणारे विश्ववंदनीय, महामानव, दिन दलितांचे कैवारी, युगप्रवर्तक, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती..

जन्म घेतला दिन दलितांचा उद्धार कराया..

संविधान लिहिण्याचे दैदीप्यमान कार्य कराया..

समाज बांधवास जगण्याचा अधिकार द्यावया..

शतशत नमन करतो मी तुजला भीमराया..

शतशत नमन करतो मी तुजला भीमराया..

🔰अध्यक्ष निवड

अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची शान..

अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची जान..

अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचा पंचप्राण..

अध्यक्ष म्हणजे शब्दसुमनांचे बाण..

अध्यक्ष म्हणजे विचारांची खान..

कोणताही कार्यक्रम म्हटला की त्याला कार्यक्रमाची धुरा सांभाळणाऱ्या अध्यक्षांची गरज असते. भिमरायांचे विचार अंगीकारून समाजामध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण करणारे श्री ......................... हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.

 🔰प्रमुख पाहुणे

आकाशातील ग्रह व तारे हे जर आपले भविष्य घडवणार असतील तर आपल्या मेंदूचा व मनगटाचा काय उपयोग? असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतरांना विचारायचे. मनुष्य हा स्वतः त्याच्या भविष्याचा शिल्पकार असतो. असेच आपल्या मनगटाच्या जोरावर समाजामध्ये स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करणारे श्री................................. हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.

🔰प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन

विषमतेचा अंधार दूर सारण्या..

मनामनात दीप पेटवूया..

करुनी प्रतिमापूजन दीपप्रज्वलन..

तेज कार्यक्रमाचे वाढवूया..

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे यांना मी अशी विनंती करतो/करते की, त्यांनी या ठिकाणी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करावे.

🔰स्वागतगीत

उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे आपल्या शाळेतील ......................... हे विद्यार्थी स्वागत गीत सादर करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.

🔰कार्यक्रमाचे प्रास्ताविक

जीवनाचे सार कळते, ग्रंथ आणि पुस्तकातून

कार्यक्रमाचा उद्देष कळतो, प्रास्ताविकातून......

आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री......................... हे सादर करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.

🔰विद्यार्थ्यांची मनोगते

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी आमच्या शाळेतील काही विद्यार्थी आज या ठिकाणी आपली मनोगते व्यक्त करणार आहेत. आपण सर्वांनी या चिमुकल्यांची मनोगते शांतपणे ऐकावीत, अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो/करते.

  1.  
  2.  
  3.  
  4.  

🔰तज्ञांचे मार्गदर्शन

जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो त्याप्रमाणे तो शिक्षणाअभावी दुसऱ्याचा गुलाम होतो..असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे.

बोलके करण्यास हवे असते संभाषण

आधारासाठी हवे असते आश्वासन

योग्य दिशा मिळण्यासाठी

आवश्यक आहे मार्गदर्शन..

विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक................... हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो/करते.

🔰अध्यक्षीय भाषण

भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे महान..

त्यांच्यापुढे वाटतात चंद्र सूर्यही लहान..

 खरंच बाबासाहेबांचे कार्य-कर्तृत्व खूप मोठे आहे.

ज्ञानरूपी मार्गाच्या

पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा

त्यासाठी मान आहे

अध्यक्षीय मार्गदशनाचा...

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ...................... हे आपल्याला या प्रसंगी मार्गदर्शन करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते.

🔰आभार प्रदर्शन

नमन त्या पराक्रमाला, नमन त्या देशसेवेला

नमन त्या ज्ञानदेवतेला, नमन त्या महापुरुषाला

नमन अशा आपल्या बाबासाहेबांना..

थेंबाथेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो

जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार, तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार..

आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ..................... हे करतील, अशी मी त्यांना विनंती करतो/करते

👉हे लक्षात असू द्या .. 

  • वरील नमूना सूत्रसंचालन हे शालेय कार्यक्रमासाठी उपयोगी आहे. 
  • स्थानिक परिस्थितीनुसार आपण त्यामध्ये योग्य तो बदल करावा.


 

Msk

Hi... Here on This blog we will share useful info to our readers.. Intention is to help peoples.. This is not a government blog. Thank You...

Post a Comment

Previous Post Next Post